4Ram_Temple.jpg
4Ram_Temple.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

#Ayodhya : राममंदिर पूर्ण व्हायला लागणार किमान इतकी वर्षे...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमीपूजन झाल्यावर अयोध्येतील रामजन्मभूमीवरील प्रस्तावित भव्य मंदिराची निर्मिती सुमारे 3 वर्षांत पूर्ण होईल. त्यानंतर रामभक्तांना या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झालेल्या श्रीरामाचे दर्शन व पूजाअर्चा करण्याचा योग येईल, अशी आशा विश्‍व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका 2022 मध्ये आहेत व त्यापूर्वीच राममंदिराचे काम पूर्ण करण्याचा सत्तारूढ भाजपचा निर्धार आहे.

विहिंपचे केंद्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार यांनी, राममंदिराच्या उभारणीत केवळ सरकारच्या भरोशावर रहाता येणार नाही तर सर्वसामान्यानीही आपापल्या परीने यात वाटा उचलायला हवा, अशी सूचक सूचना केली आहे.

अयोध्येतील वादग्रस्त वास्तू विध्वंस प्रकरणात विश्‍व हिंदू परिषदेची भूमिका मोठी होती. आलोककुमार यांनी लिहीलेल्या लेखात म्हटले आहे की कोट्यवधी सश्रध्द भारतीयांनी अयोध्येतील जन्मभूमीवर भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराची पुनर्स्थापना करण्याचे स्वप्न पाहिले होते. 1989 मध्ये राममंदिराचा शिलान्यासही अयोध्येत झाला होता. 


मात्र सरकारी अडथळे, राजकीय डावपेच व न्यायालयीन विलंबाच्या फेऱ्यात राममंदिराची प्रत्यक्ष उभारणी रखडली होती. आता तब्बल 31 वर्षांनी हा शुभयोग जुळून येत आहे. केवळ मंदिर बनविण्यासाठी नव्हे तर रामराज्याच्या पुनर्स्थापनेसाठी व पृथ्वीवर "रामत्व' स्थापन करण्यासाठीच हे सारे प्रयत्न सुरू आहेत. ज्या समाजात समतामूलक भावना आहे, ज्यात सर्वांना प्रतिष्ठा मिळते, रोटी, कपडा और मकान याबरोबरच शिक्षण, आरोग्य व रोजगाराचीही हमी प्रत्येक नागरिकाला ज्यात मिळेल अशा रामराज्याच्या निर्मितीसाठीच विहिंपचे सारे प्रयत्न सुरू असून राममंदिर निर्माण हा त्यातील एक टप्पा आहे असेही त्यांनी म्हटले आहे. राममंदिराच्या उभारणीच्या प्रत्येक टप्प्याबरोबर देशात समरसतापूर्ण, उच्चनीचतेची भावना नसणाऱ्या शोषण-मुक्त समाजाच्या निर्मितीचाही ऐकक टप्पा पूर्णत्वास जावा अशी अपेक्षा व्यक्त करताना आलोककुमार यांनी शबरी, निषादराज व अहिल्या यांचाही नामोल्लेख केला आहे.


राम मंदिराचे भूमिपूजनानिमित्त अयोध्येसह संपूर्ण उत्तर प्रदेश व देशातही उत्साहाचे वातावरण आहे. भूमिपूजनाआधी धार्मिक कार्यक्रमांना कालपासूनच सुरुवात झाली असून आज रामार्चा पूजा झाली. भूमिपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा देण्यात आला असल्याने व अनेक महत्त्वाच्या व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे.

भूमिपूजन परिसरात मोबाईल, कॅमेरा किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास परवानगी नाही. प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर क्रमांक आहेत. त्या क्रमांकाची यादी पोलिसांकडे देण्यात येणार आहे. हा क्रमांक आणि नाव पडताळूनच कार्यक्रमस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे, असे श्रीराम जन्‍मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी सांगितले.
Edited  by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT